ठाणे : ‘इशरत दहशतवादी असल्याचे हेडलीकडून वदवून घेण्यात आले आहे. ज्यांनी तिचा एन्काउंटर केला त्यांना वाचवण्याचे हे कारस्थान आहे. माझी इशरत निर्दोष आणि निष्पाप होती. मी मुलगी गमावली, चौकशीचा जाच आणि बदनामीचा त्रास गेल्या १२ वर्षांपासून आमचे कुटुंब भोगत आहे,’ अशा शब्दांत इशरत जहाँची आई शमिमा कौसर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी डेव्हिड हेडलीने न्यायालयात साक्ष देताना इशरत ‘सुसाईड बॉम्बर’ होती व ‘लष्कर-ए-तोयबा’साठी काम करीत होती, अशी कबुली दिली. तिच्यावर गुजरातचे अक्षरधाम मंदिर उडविण्याची जबाबदारी होती, असेही त्याने सांगितले. याकडे कौसर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हेडलीच्या सर्व आरोपांचा इन्कार करीत आपली मुलगी १०० टक्के निष्पाप होती. तिला विनाकारण यामध्ये गोवल्याचा पुुनरुच्चार केला. हेडलीकडून हे सर्व हेतूत: वदवून घेतले आहे. मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये शिकत असताना तिची नियमित हजेरी होती. तेथील तिचे रेकॉर्ड चांगले होते. तिचे शिक्षकही हीच ग्वाही देतील, असे त्या म्हणाल्या.
कौसर म्हणाल्या की, हेडलीला ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही मालिकेतील प्रश्नमंजुषेच्या धर्तीवर तीन नावांचे पर्याय दिले गेले व त्याने त्यामधील इशरतचे नाव घेतले. ही सर्व पद्धती सदोष असून, इशरतला दोषी ठरवून कोणाला तरी वाचविण्याचा आणि तिला बदनाम करण्याचाही डाव आहे. यामागे नेमका कोणाला वाचविण्याचा डाव आहे, असा सवाल केला असता ज्यांनी तिला एन्काउंटरमध्ये मारले, त्यांनाच वाचविण्याचा हा डाव आहे. हा डाव कोणी रचला असेल, असे तुम्हाला वाटते, असे विचारल्यावर कौसर निरुत्तर झाल्या. ‘वो मालुम नही,’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले.
हेडलीला इशरतचे नाव घेऊन काय मिळणार, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, हेडलीला असे पढवले असेल. यापूर्वीच इशरतचा खून झाल्याचे सीबीआय, एसआयटी तसेच न्यायालयाच्या चौकशीत उघड झाले आहे, याकडे कौसर यांनी लक्ष वेधले. इशरतच्या साथीदारांपैकी दोघे पाकिस्तानी होते, त्यासंदर्भात विचारले असता याबद्दल काही माहिती नसल्याचे कौसर यांनी सांगितले.