आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण
मुंबई / अजेयकुमार जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु आहेत. सन १९४४ मध्ये शाळेसाठी बाबासाहेबांनी पै पै जमा ट्रस्टच्या नावाने विकत घेतलेल्या भूखंडवार शाळा बांधली गेलेली नाही. ट्रस्टमध्ये अनेक गैरप्रकार होत आहेत याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने दोषीवर कारवाई करावी तसेच भूखंडावर शाळा बांधण्यात यावी या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात राजेंद्र पवार यांनी १ फेब्रुवारी २०१६ पासून ७ दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
राजेंद्र पवार गेले दीड दोन वर्षे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स एम्प्रुव्ह्मेंट ट्रस्टच्या गैरकारभाराबाबत माहिती अधिकारात माहिती मिळवून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालले असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. दादर गोकुळदास पास्ता रोड येथील आंबेडकर भवन हा भूखंड शाळेच्या उपयोगासाठी स्वतः बाबासाहेबांनी विकत घेतला होता. परंतू या ठिकाणी शाळा न बांधता आंबेडकर भवन बांधण्यात आले. आंबेडकर भवन लग्नासाठी भाड्यावर देवून लाखो रुपये ट्रस्टला मिळत आहे. १९९५ ते २०१४ पर्यंत आंबेडकर भवनमधून मिळालेला हा पैसा गेला कुठे ? आंबेडकर भवन मध्ये क्याट्रसची मोनोपोली असते. या मोनोपोलीसाठीही तृप्ती क्याट्रसकडून २० लाख रुपये डीपोझिट म्हणून कसे घेण्यात आले ? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले आहेत.
शाळेसाठी विकत घेतलेल्या या भूखंडावर बांधण्यात आलेल्या आंबेडकर भवन मध्ये गैरप्रकार सुरु असतानाच आता आंबेडकर भवन बिल्डरच्या घश्यात घातले जात आहे असा आरोप पवार यांनी केला आहे. बाबासाहेबांच्या याच ट्रस्टला नवी मुंबईत सानपाडा येथे सेक्टर १० येथे प्लॉट नंबर ४२ मध्ये सन २००५ मध्ये सिडकोने सामाजिक आणि सांस्कृतिक उपयोगासाठी भूखंड दिला होता. हा भूखंड ट्रस्टच्या काही पदाधिकाऱ्यानी बिल्डरच्या घश्यात घातला आहे असा आरोपही पवार यांनी केला आहे. आंबेडकर भवनच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाले आहे याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे करूनही कोणतीही कारवाई होत नाही. ट्रस्टमध्ये चाललेल्या गैरप्रकाराबाबत राज्य सरकार, धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केल्या माहिती अधिकारात माहिती आयोगा पर्यंत जाऊनही कोणताही न्याय मिळाला नसल्याने १ फेब्रुवारी पासून आझाद मैदानात ७ दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले असल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले. दरम्यान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.