सर्वांना स्वच्छ व परवडणारी ऊर्जा देण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2016

सर्वांना स्वच्छ व परवडणारी ऊर्जा देण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी ऊर्जा हा महत्त्वाचा घटक आहे. ऊर्जा ही जगाला चेतना देते. सर्वांना स्वच्छ व परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरविण्यास शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
टाटा पॉवर कंपनीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्डस एन्ड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन सायरस मिस्त्री, व्यवस्थापकीय संचालक अनिल सलढाणा आदी उपस्थित होते.

शतक महोत्सवी वर्षानिमित्त कंपनीच्या प्रशासन व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांना स्वच्छ व परवडणारी ऊर्जा देण्याचे कार्य ‘टाटा पॉवर’ने गेल्या 100 वर्षापासून अव्याहतपणे चालू ठेवले आहे. आज सारे जग भारताकडे गुंतवणूकीस उत्तम देश म्हणून पाहत आहे. ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ या सर्व संकल्पना पूर्ण करण्यास उत्कृष्ट ऊर्जेची गरज आहे. यामध्ये टाटा पॉवरसारख्या कंपन्या मोलाचे योगदान देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री. फडणवीस, श्री. बावनकुळे, श्रीमती आंबेकर यांचे संदेश एका टाईम कॅप्सूलमध्ये बंद करण्यात आले. पुढील 25 वर्षानंतर या संदेशांचे वाचन करण्यात येणार आहे. यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते टाटा पावर कंपनीच्या ‘अनटोल्ड टेल्स’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

Post Bottom Ad