मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये धुमसणाऱ्या आगीचा धूर अखेर आज आठवड्याभरानंतर पालिकेच्या महासभेपर्यंत पोहोचला़ या ठिकाणी कचरा पुनर्प्रक्रिया करणारी कंपनी कोणाची, येथील माफियांना सत्ताधारी का जेरबंद करीत नाहीत, असा सवाल करीत स्थानिक नगरसेवकांनी शिवसेना भाजपाला निरुत्तर केले़
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने गेल्या बुधवारी पेट घेतला़ तेव्हापासून ही आग धुमसत असून स्थानिकांचा जीव गुदमरत आहे़ संपूर्ण पूर्व उपनगराला या आगीचा त्रास होत असल्याने या गंभीर प्रश्नावर पालिकेची महासभा आज बोलाविण्यात आली़ या चर्चेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहभाग घेत प्रशासनावर हल्लाबोल केला़
डम्पिंग ग्राउंडवर आजही गर्दुल्ले फिरतात, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या विषयावरील आपल्या निवेदनातून केला़ या आगीला प्रशासनाबरोबर आपणही जबाबदार असल्याचे काँग्रेसच्या वकारुन्नीसा अन्सारी यांनी स्पष्टोक्ती केली़ डम्पिंग ग्राउंडवर आजही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, याकडे समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी लक्ष वेधले़