इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने सामोरे जावे – महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2016

इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने सामोरे जावे – महापौर स्नेहल आंबेकर

मुंबईच्या महापौरांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे साधला विद्यार्थ्यांशी संवाद
मुंबई http://www.jpnnews.in
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक नामवंत व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ घडलेले आहेत. अशी ही गौरवशाली परंपरा लक्षात घेता, दहावीच्या विद्यार्थ्यांनी येत्या परीक्षेत आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका शालेय विद्यार्थ्यांशी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ द्वारे सुसंवाद साधताना केले. यावर्षी महापालिका शाळांतील १० हजार ७९२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार आहेत. या विद्यार्थ्यांशी महापौरांनी संवाद साधून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


महानगरपालिकेने देशात पहिल्यांदा ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे महापालिकेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देणारी यंत्रणा राबविली. महापौर स्नेहल आंबेकर यांनी बृहन्मुंबई क्षेत्रातील ४८० शाळांत सुरु असलेल्या या ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे आज विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. दिनांक ०१ मार्च ते २२ मार्च २०१६ या दरम्यान महापालिकेतील १० हजार ७९२ विद्यार्थी शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी सामोरे जात आहेत. यात ५ हजार ६०० मुली तर ५ हजार १९२ मुले परीक्षेसाठी बसली आहेत.

महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले की, शालेय शिक्षण घेत असताना शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ही शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाची असते. या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर परिश्रम घेत असतात. याकरीता विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकही खूप मेहनत घेत असतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन उंच भरारी घ्यावी, आपण केलेल्या वर्षभर अभ्यासाची परीक्षेत व्यवस्थित मांडणी करावी, परीक्षेसाठी जाताना अत्यावश्यक सर्व वस्तू बरोबर ठेवाव्यात. परीक्षेसाठी आलेले मूळ ‘हॉल तिकिट’ जवळ बाळगून त्याची एक छायांकित प्रत दक्षता म्हणून घरी ठेवण्यात यावी.

आपण महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महापालिका शाळांत आज खासगी शाळांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा देण्यात येतात. यासोबतच नामवंत तज्ज्ञांकडून ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे मार्गदर्शन देण्यात येत आहे. वर्षभर केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी. आता थोडा कालावधी शिल्लक असल्यामुळे केवळ अभ्यासाचाच विचार करावा, असा मार्गदर्शक सल्लाही महापौरांनी विद्यार्थ्यांना दिल्या. या सुसंवादाप्रसंगी वरळी येथे जे.के. मार्ग येथील महापालिका शाळा, बोरिवली, अंधेरी, कांदरपाडा, चेंबूर स्थानक, गोवंडी, गोशाळा इंग्रजी माध्यमिक या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे महापौरांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad