बृहन्मुंबई उत्तर विभागातील पाचशे शाळा होणार सहभागी
मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
विद्यार्थी वाचनाकडे वळावेत, वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग कार्यालयाने जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे. घाटकोपर येथील एस एस एस मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूलच्या पटांगणावर १५ व १६ फेब्रुवारी रोजी हा ग्रंथमहोत्सव होणार असून अनेक नामवंत प्रकाशकांचे दालने, कवी संमेलन, परिसंवादात साहित्यिक व कवी सहभागी होणार असल्याचे शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.
जेष्ठ साहित्यिक व कवी नीरजा यांच्या हस्ते या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होणार असून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी घाटकोपरमध्ये सकाळी ग्रंथदिंडी निघणार असून यात विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता मुख्य उद्घाटन सोहळा होईल. दुपारी विद्यार्थ्यांसाठी लेखक आपल्या भेटीला या सत्रात कवी नीरजा व हमीद इक्बाल सिद्धीकी सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ४ शिक्षक शिक्षक काव्यसंमेलनाच्या सत्रात लोकशाहीर संभाजी भगत व शिक्षककवी सहभागी होतील. संध्याकाळी ४ वाजता चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे विद्यार्थी मुलगी झाली हो हि नाटिका सादर करणार आहेत.
ग्रंथमहोत्सवाच्या दुसर्या दिवशी १६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता उत्तर विभागातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे कवी संमेलन होणार आहेत. सकाळी १०. ३० वाजता पुस्तकांच्या सहवासात या विषयावर प्रा. नीता माळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगणार आहेत. ११.३० वाजता शालेय शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर डिजिटल क्रांतीचे प्रणेते संदीप गुंड शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १.३० वाजता कथाकथनकार एकनाथ आव्हाड विद्यार्थ्यांना बालकथा सांगणार आहेत. समारोपसत्र ३ वाजता सुरु होईल समारोपाला जेष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, शिक्षक आमदार रामनाथ मोते, शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथमहोत्सवात उत्तर विभागातील सुमारे पाचशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक सहभागी होणार असून मराठी भाषा वाचकांनीही या ग्रंथमहोत्सवाला भेट देऊन वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे, उपनिरीक्षक बी.डी.पुरी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे यांनी केले आहे.