मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
फोर्ट येथील प्रसिद्ध महात्मा जोतिबा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता. 2) महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतला. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच मंडईची दुरुस्ती करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
पालिका क्रॉफर्ड मार्केटची दुरुस्ती करत आहे. मंजूर आराखड्यानुसार गाळे बनवून दिले जात नाहीत, प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत नव्याने बांधकाम केले जात आहे. यावर व्यापाऱ्यांनी आक्षेप घेऊन मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले. काही वेळ दुकानेही बंद ठेवली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आमदार राज पुरोहित यांच्यासह पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या वेळी व्यापाऱ्यांनी पालिकेने तयार केलेले गाळ्यांचे जुने आराखडे दाखवले. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच मंडईची दुरुस्ती करू, असे आश्वासन या वेळी आयुक्तांनी दिले. त्यामुळे संप मागे घेतल्याचे महात्मा फुले मार्केट दुकानदार सेवा संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर कराळे यांनी सांगितले.