मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
पाश्चिमात्य देशातून संक्रमित होणाऱ्या ‘झिका’ विषाणूपासून होणाऱ्या आजाराबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये. राज्य शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यंत्रणेने डासांच्या अळी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले. विशेषत: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेच्या प्रचाराकडे अधिक लक्ष द्यावे. या आजारावर सध्या तरी कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले
मंत्रालयात आयोजित ‘महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समिती’च्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वाईन फ्लू लसीकरण मोहिमेचा आढावाही घेण्यात आला. बैठकीस संचालक (आरोग्य सेवा) डॉ. सतीश पवार, सहसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन जगताप, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे डॉ. मनदीप चड्डा, समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले की , ‘झिका’ विषाणूपासून होणाऱ्या आजाराची लक्षणे ही सौम्य डेंग्यूसारखी असतात. हा आजार एडीस जातीच्या डासापासून होत असल्याने या डासाची उत्पत्ती रोखणे हा यावरील प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून जनजागृती करावी.
‘झिका’ हा आजार झालेल्या रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, स्नायूदुखी, डोळे येणे, पुरळ उटणे (रॅश येणे), डोळे लाल होणे ही लक्षणे आढळतात. त्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, असे सांगून आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गतवर्षी शासकीय आरोग्य यंत्रणांमार्फत स्वाईन फ्ल्यूची मोफत एन्फ्लूएंजा लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्याचा38 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. त्यामध्ये गरोदर माता, उच्च रक्तदाब व मधुमेही रुग्णांचा प्रामुख्याने समावेश आहे. तथापि जास्तीत जास्तनागरिकांनी या लसीकरणाचा फायदा घ्यावा यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावी पध्दतीने प्रसार मोहीम राबवावी.
असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील शहरी भागात मेंदूज्वराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. विशेषत: या आजाराचे बालकांमध्ये जास्त प्रमाण आढळून येते. या संदर्भात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बैठकीत दिले.