सत्ताधारी आणि इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले
मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक व सदस्य अभ्यास दौ-याच्या नावाखाली अंदमान-निकोबारला सहलीसाठी (२८ जानेवारी) गेले होते. या अभ्यास दौ-याची दखल नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) घेतली असून त्यांनी महापालिकेतील सर्वच अभ्यास दौ-याची चौकशी करून त्यासाठी झालेल्या सर्व खर्चाची चौकशी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच अभ्यास दौऱ्यांची चौकशी कॅगने सुरु केल्याने सत्ताधारी आणि इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
अभ्यास दौरा म्हणजे केवळ सहलच असून स्थायी समितीबरोबरच महिला बालकल्याण व स्थापत्य उपनगरे या समित्यांचे दौरेही अंदमानला गेले होते. त्यापाठोपाठ इतर विशेष समित्यांचे अभ्यास दौरे सिक्कीम, जम्मू-काश्मीर, केरळ आदी राज्यांत आयोजित करण्यात आले होते. यातील सार्वजनिक आरोग्य समिती आणि विधि व महसूल समितीने आपले दौरे रद्द केले आहेत. परंतु या अभ्यास दौ-यांवर केल्या जाणा-या खर्चाची दखल खुद्द नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) घेतली आहे.
अंदमान दौ-यावर असतानाच महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांनी आपल्या विभागाला सूचना करत मागील दहा वर्षापासूनच अभ्यास दौ-यांची माहिती जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रत्येक वैधानिक व विशेष समित्यांच्या अभ्यास दौ-यांचा हिशोब जमा विभागाने तयार केला आहे. अभ्यास दौ-यांच्या खर्चाची माहिती विभागाने तयार केल्यानंतर गुरुवारपासून कॅगच्या अधिका-यांनी हा हिशोब तपासायला सुरुवात केली आहे.
कॅगच्या अधिका-यांकडून आजवर कधीही अभ्यास दौ-यांच्या खर्चाची माहिती मागवून घेतली नव्हती. परंतु स्थायी समितीच्या अंदमान दौ-यानंतर प्रथमच कॅगने या वायफळ खर्चाची दखल घेत परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात कशाप्रकारे अभ्यास दौ-यावर खर्च झाला आहे आणि ऐनवेळी रद्द झाल्यामुळे कसे नुकसान झाले आहे, कोणत्या पक्षामुळे आणि सदस्याकरता हा खर्च झाला आहे, हे सर्व आता कॅगच्या अहवालातून उघड होणार आहे.