मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या बहुचर्चित आणि "बिग बजेट‘ सागरी सेतू (ट्रान्सहार्बर लिंक) प्रकल्पाला सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. मार्चपर्यंत निविदा मागवल्या जातील. ऑक्टोबरमध्ये बांधकाम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संजय शहा आणि नमन श्रीवास्तव यांच्या "पर्सुट ऑफ ऍफोर्डेबल हाउसिंग‘ या पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्प राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 15 वर्षांपासून हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता. मात्र केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्व अडथळे दूर झाले आहेत. पर्यावरणीय मंजुरीही मिळाली असून मार्चमध्ये निविदा प्रक्रिया सुरू होईल. जपानमधील "जायका इंटरनॅशनल‘ कंपनीकडून या प्रकल्पाला अर्थसाह्य केले जाणार आहे. राज्य सरकार "एक खिडकी योजने‘ला प्रोत्साहन देत आहे. अनावश्यक परवान्यांची संख्या कमी करून उद्योजकांना ऑनलाइन परवाने दिले जातील. सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत परवान्यांची संख्या 52 टक्के कमी केली आहे. ती आणखी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. काही महिन्यांत राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांत परवान्यांसाठी ई-प्रणाली सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अनेक परवाने लागत असल्याने राज्यात व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे, अशी व्यथा बांधकाम व्यावसायिकांनी या वेळी मांडली. जाचक अटी वगळून खार, पडीक, कृषक जमिनी गृहनिर्माण प्रकल्पांना खुल्या करण्याची मागणी या वेळी विकसकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "हाउसिंग फॉर ऑल 2022‘ या धोरणानुसार घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार केंद्राच्या धोरणाचा अवलंब करील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. खार जमिनींबाबत केंद्राशी चर्चा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला ब्रिक ईगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कृष्णन, वास्तुरचनाकार हाफिझ कॉन्ट्रॅक्टर, महिंद्रा लाईफ स्पेसचे अरुण नंदा, मधुसूदन मेनन, राजेंद्र जोशी उपस्थित होते.