गुड समारीतन मिशन संघटनेच्यावतीने मुंबईमधील झोपड़ीधारकांच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या आंदोलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी सहभाग घेत झोपड़ीधारकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी गरिबांचे प्रश्न समजून घेताना देशातील एकही झोपडपट्टीवर मे ते सप्टेंबर दरम्यान कारवाई केली जाणार नाही, असे आदेश केंद्र सरकारने देण्याची मागणीही जशोदाबेन यांनी यावेळी केली.
झोपडपट्टय़ांच्या प्रश्नावर उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘गुड समारीतन मिशन’ संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘पावसाळय़ाच्या तोंडावर झोपडपट्टय़ांवर कारवाईत अनेक लोक बेघर होऊन त्यांचे हाल होतात. त्यांची मुलेबाळेही रस्त्यावर येतात. अश्या परिस्थितीत अनेक लोक आजारी पडून काही लोकांचा मृत्यूही होतो. यामुळे पावसाळयात झोपड्या तोडू नए अश्या मागण्यासाठी गुड समारीतन मिशन संघटनेच्यावतीने ब्रदर पिटर पोल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
रस्त्यावरील मुलांसाठी काम करणा-या ‘गुड समारीतन मिशन’मुळे याची माहिती आपणाला मिळाली. या संस्थेकडून विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टीलाही त्यांनी भेट दिली. संस्थेचे लहान मुलांसाठी चालवलेले कार्य पाहिले. मी, जर याप्रश्नी उपोषणाला बसले तर प्रशासन त्याचा विचार करेल, असे संस्थेचे म्हणणे होते. त्यामुळे एक दिवसाचे उपोषण केल्याचे जशोदाबेन यांनी सांगितले.
जशोदाबेनसोबत त्यांचा लहान भाऊ अशोक चिमणलाल मोदी व वहिनी जशोदाबेन अशोक मोदी हे दोघेही उपोषणाला बसले होते. गुजरातमध्ये किराणा व्यवसाय करताना सामाजिक कार्य करत असल्याचे अशोक यांनी यावेळी सांगितले. याआधी कोणत्याही संस्थेने आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले नव्हते. मात्र यापुढे सामाजिक कार्यासाठी ताईसह आंदोलनात उतरायला आवडेल, असे मतही अशोक यांनी व्यक्त केले.