‎" शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे की, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी?' - सचिन अहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2016

‎" शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे की, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी?' - सचिन अहिर

मुंबई http://www.jpnnews.in 
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे की, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. सध्या राज्यात दर महिन्याला होणारे सरकारी सोहळे आणि इव्हेेंट पाहता, महाराष्ट्राच्या जनतेने राज्य सरकार नव्हे, तर जणु एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला सरकार चालवायला दिल्यासारखी परिस्थिती आहे, असा टोला त्यांनी हाणला. जनतेच्या पैशाने होणाऱ्या या साेहळ्यांचा हिशोब सरकारने द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच सरकार सोहळ्यात मग्न आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची थट्टा करण्यात दंग असल्याचे सांगत अहिर यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचाही निषेध केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपाळ शेट्टींच्या मुंबईतील निवासस्थानासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.


सध्या राज्याच्या ग्रामीण भागातील जनता दुष्काळाने त्रस्त आहे. माणसे आणि जनावरांचा जीव पाण्याअभावी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत सरकार आपल्याला मदत करेल या आशेवर राज्यातील जनता आला दिवस ढकलत अाहे. मात्र जनतेला मदत करण्याऐवजी या राज्याचे सरकार कोट्यवधींचे साेहळे करण्यात मग्न आहे. या सरकारी उधळपट्टीची सुरूवात या सरकारच्या शपथविधी सोहळ्यापासूनच सुरू झाल्याचे सांगत अहिर म्हणाले की, मंत्रिमंडळाचा शपथविधी हा राजभवनात करण्याचा संकेत आहे. मात्र या सरकारने चक्क वानखेडे स्टेडियमवर कोट्यवधींची उधळण करत हा सोहळा साजरा केला. एकिकडे शेतकऱ्यांना मदतीसाठी अपुऱ्या निधीचे कारण पुढे करत मदत नाकारली जाते, मात्र त्याच वेळी मुंबईत मेक इन इंडियाचे सोहळे केले जात असल्याकडे मा. अहिर यांनी लक्ष वेधले. सरकारचे हे इव्हेंट प्रेम पाहून आपण खरोखरच राज्य सरकार निवडून दिले आहे, की एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच आतापर्यंत अशा सोहळ्यांच्या माध्यमातून जनतेचा किती पैसा वाया घालवला याचा हिशोब सरकारने द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.


एकिकडे सरकार सोहळ्यात मग्न तर दुसरीकडे त्यांचे लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्ये करून शेतकऱ्यांच्या अगतिकतेची थट्टा करत असल्याचे सांगत मा. अहिर यांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टींच्या वक्तव्याचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची फॅशन अाली आहे, असे असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या शेट्टींच्या खासदारकीचा राजिनामा द्यावा मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच शुक्रवारी सकाळी पश्चिम उपनगरातील शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील जनतेला मदत करण्याऐवजी उलट चारा छावण्या बंद करणाऱ्या या सरकारचे डोके तपासावे लागेल, असे सांगत अहिर यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad