यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शोधनिबंध मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता विद्यापीठाने यासाठी २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. २१, २२ आणि २३ एप्रिल २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. आंबेडकर यांचे राजकीय चिंतन आणि जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या समस्या, मूलतत्त्ववादाचा उगम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मविषयक विचार, भारतीय संविधानातील लोककल्याणकारी राज्याची भूमिका आणि जागतिकीकरण, जागतिक शांतता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि डॉ. आंबेडकर यांनी कृषी व्यवस्थेची केलेली मांडणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्रीमुक्ती विषयक विचार, दलित साहित्याचे वैश्विक स्वरूप या विषयांवर शोधनिबंध मागविण्यात आले आहेत.
शोधनिबंधासाठी शब्दमर्यादा तीन हजार असून इच्छुकांना आता आपले शोधनिबंध दि. २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी seminarapril16.hss@ycmou.ac.in या ई-मेलवर मराठी युनिकोडमध्ये पाठविता येतील. मात्र शोधनिबंध हा यापूर्वी प्रसिद्ध झालेला नसावा. तसेच त्याला सहलेखक नसावा असे या चर्चासत्राचे संयोजक प्रा. प्रवीण घोडेस्वार आणि मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी कळविले आहे.