मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार येथील कचराभुमीच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केलेले असतानाही महापालिकेतील सत्ताधारी फक्त पाहणी करण्याव्यतिरिक्त काहीही करत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. गेला आठवडाभर देवनार कचराभुमी धुमसत असतानाही महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी निष्क्रिय असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या वतीने अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गोवंडी बैंगणवाडी चौकात रास्तारोकाे करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक आणि स्थानिक रहिवाशी सामिल झाले होते.गेले आठवडाभर देवनार कचराभुमी आगीच्या भक्ष्यस्थानी असून त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे आसपासच्या परिसरातील स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. भविष्यात ही समस्या अजून उग्र होणार असल्याचे माहित असूनही महापालिकेतर्फे अद्याप काहीही हालचाल होत नसल्याबद्दल अहिर यांनी संताप व्यक्त केला. सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही त्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल करत ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात या मुद्द्यावर उपापयोजना सुचवण्यासाठी आम्ही शरद काळे, अजित जैन आणि महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी आदी तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीचे या सरकारच्या कार्यकाळात काय झाले त्याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजपाचे नेते फक्त देवनार कचराभुमीला भेट देत आहेत.पण ठोस उपाययोजना केल्या जात आहेत, असे चित्र दिसत नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला.
महापौरांना दाखवले काळे झेंडे
इकडे मुंबईत देवनार कचराभुमीचा प्रश्न एैरणीवर आलेला असताना त्याच काळात महापौरांसह शिवसेना आणि भाजपचे काही नगरसेवक परदेशी दौऱ्यावर गेले होते.सत्ताधाऱ्यांच्या या असंवेदनशील कृतीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी मुंबई विमानतळावर अनोखे आंदोलन करण्यात आले होते. परदेशी दौऱ्यावरील नगरसेवक मुंबईच्या विमानतळावर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.