मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीप्रकरणी माफिया व बिल्डर लॉबीला दोषी ठरविणाऱ्या पालिका प्रशासनाला अग्निशमन दलानेच घरचा अहेर दिला आहे़ या डम्पिंग ग्राउंडमध्ये आत जाण्यास जागा शिल्लक नसल्याने आगीचा बंब पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला़ त्यामुळेच आग वाढत गेल्याचे अग्निशमन दलाने अहवालात स्पष्ट केले आहे़
गेल्या दोन आठवड्यांपासून देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा पेटत आहे़ यामुळे देवनार परिसरातीलच नव्हे तर पूर्व उपनगरातील रहिवाशांचाही जीव गुदमरू लागला आहे़ वारंवार लागणाऱ्या या आगीमागे भंगार माफिया असल्याचा आरोप होत आहे़ मात्र ही आग लावली अथवा लागली तरी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आतपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत़ देवनार डम्पिंग ग्राउंडकडे जाणारे रस्तेच कचऱ्याने भरले असल्याने त्या ढिगाऱ्यावरूनच गाडी चालविणे अग्निशमन दलास भाग पडले़ पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत़ मिथेन वायूमुळे आग पसरत गेली, हे एक कारण असले तरी आग वाढत जाण्यास आतमधील रस्त्यांवरील कचऱ्याचा ढीग कारणीभूत असल्याचे अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़