मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
रेल्वे अपघातातील प्रवाशाला तत्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पश्चिम रेल्वेकडून वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहेत. सध्या ३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्यात आल्यानंतर आणखी ७ स्थानकांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत हे कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वे अपघात झाल्यावर ताबडतोब उपचार न मिळाल्यामुळे काही प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. ही परिस्थिती पाहता प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वेला देण्यात आले होते. त्यानुसार गर्दीच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कक्षात एक डॉक्टर, नर्स आणि मदतनीस असणार असून, मध्य रेल्वेकडून नुकतेच ठाणे आणि पनवेल स्थानकात हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेकडूनही १० स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा प्रक्र्रिया राबविण्यात आल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेकडून निविदा काढण्यात आल्याने त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर नुकतीच मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि गोरेगाव स्थानकात कक्ष सुरू करण्यात आले. आता उर्वरित स्थानकात वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. चर्चगेट, बोरीवली, विरार स्थानकात १६ फेब्रुवारी तर अंधेरी, कांदिवली, वसई रोड आणि पालघर स्थानकात २६ फेब्रुवारीपर्यंत हे कक्ष उभारले जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. या कामासाठी ६.२0 कोटींची तरतूद असल्याचे सांंगितले.