येत्या साडेतीन वर्षात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाटयगृह उभारणार –विनोद तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 February 2016

येत्या साडेतीन वर्षात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाटयगृह उभारणार –विनोद तावडे

रजनी जोशी आणि रामकृष्ण नायक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
मुंबई http://www.jpnnews.inदि.१७ फेब्रुवारी - 
येत्या साडेतीन वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह बांधणार तसेच जी नाट्यगृह नगरपालिका व नगरपरिषदेच्या ताब्यात आहेत त्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून ही नाट्यगृहे सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आणि महाराष्ट्रातील नाट्य संस्कृतीची जोपासना करणार असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज काढले.

बोरीवली येथील प्रबोधनकार नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दिला जाणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१५-१६ रजनी जोशी यांना ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार व नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१५-१६ रामकृष्ण नायक यांना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानचिन्ह, मानपत्र आणि ५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, कला ही राजपुरस्कृत असली पाहिजे. नजिकच्या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची शाखा महाराष्ट्रामध्ये सुरु करण्यात येईल. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरु करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

संगीत नाटके आणि व्यावसायिक नाटके पुढे यावीत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत त्यांची जोपासना व्हावी यादृष्टीने सरकार नक्कीच प्रयत्न करेल असेही तावडे यांनी सांगितले. उत्सवमूर्ती रामकृष्ण नायक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण गेली अनेक वर्षे रंगभूमीची निष्ठेने सेवा केली. नाट्यसेवेला धर्म मानला, त्याचे बाजारीकरण होऊ दिले नाही असे करत असतानाच आपण समाजापासून दूर तर जात नाहीना अशी भावना मनात येत असतानाच आपल्यासारख्या सामान्य माणसाला राज्य सरकारने कोपऱ्यातून शोधून काढले आणि पुरस्कार प्रदान करुन जो सन्मान केला त्याबद्दल आपण तावडे यांचे आभारी आहोत. तर रजनी जोशी यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जी आपण मनोभावे सेवा केली त्याचा महाराष्ट्राने जो आपला गौरव केला तो खऱ्या अर्थाने कलेचा गौरव आहे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज, नव निर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार हेमंत टकले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad