मुंबई शहराचे वीज दर समान ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2016

मुंबई शहराचे वीज दर समान ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा - मुख्यमंत्री

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in दि. 9 : 
मुंबई शहरास विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट,टाटा पॉवर कंपनी व रिलायन्स एनर्जी या तीनही कंपन्यांनी वीजेचे दर समान ठेवण्याबाबतचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्युत पुरवठा विभागाच्या बैठकीत दिले.

          
मंत्रालयात मुंबई परिसरातील विद्युत पुरवठ्याबाबत बेस्ट,टाटा पॉवर कंपनी व रिलायन्स एनर्जी या तीन कंपन्यांच्या आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील, टाटा पॉवर कंपनी, रिलायन्स एनर्जी, महावितरण व महापारेषणचे अधिकारी उपस्थित होते.
          
ट्रॉम्बे येथील टाटा पॉवर कंपनीच्या संच 6 हा तेलाऐवजी कोळशावर चालू करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई परिसरात विद्युत उपक्रमांच्या उपकेंद्रांसाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित करावी व भूखंड आवंटित करण्याच्या सूचना नगरविकास विभाग व महापालिकेला दिली. तसेच विकास नियंत्रण नियमावली 1991 मध्ये योग्य ते बदल करुन कमीत कमी जागेत भूमिगत उपकेंद्र (जीआयएस) इमारतीच्या बेसमेंट मध्ये उभारण्‍यासाठी नियमावलीत आवश्यक ते बदल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. टाटा पॉवर कंपनी आणि महापारेषण कंपनीने मुंबई पारेषण प्रणाली मजबूत करण्यासंबंधीची कामे कमीत कमी वेळात पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

Post Bottom Ad