१२ वी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेणार - विनोद तावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2016

१२ वी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेणार - विनोद तावडे

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै, २०१५ मध्ये घेण्यात आली होती. याच पद्धतीने आता २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२वी ची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
या निर्णयामुळे १२वी च्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार असून या फेरपरीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होता येणार असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी १०वी परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत आयोजित करून त्याचा निकाल २५ ऑगस्ट, २०१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि ते नव्याने इयत्ता ११वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरले त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले होते.

दहावी आणि बारावीच्या नियमित परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात आणि पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येतात. परंतु गेल्यावर्षी तावडे यांनी दहावीच्या फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले नाही आणि ते निकालानंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. त्यामुळे आता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) च्या फेरपरीक्षाही याच सुमारास होतील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad