महापालिकेची 'झिका' विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत कार्यवाही सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

महापालिकेची 'झिका' विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत कार्यवाही सुरू

१० दिवसात २४ विभागातील २ लाख ३२ हजार घरांची केली तपासणी
मुंबई / www.JPNnews.in
जगातील साधारणपणे २० देशांमध्ये 'झिका' विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. 'डेंग्यू' व 'चिकून गुनिया' या आजारांना पसरविण्यास कारणीभूत ठरणारे 'एडिस इजिप्ती' हे डासच 'झिका' विषाणूचे वाहक असतात. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका क्षेत्रात 'एडिस इजिप्ती' डासांची विशेष शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

दिनांक ३० जानेवारी २०१६ ते ०९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत 'एडिस इजिप्ती' डासांची विशेष शोधमोहिम राबविण्यात आली या दरम्यान २ लाख ३२ हजार ६६७ घरांची तपासणी करण्यात आली. तसेच १ लाख ९८ हजार ६४१ कंटेनर्सची देखील तपासणी करण्यात आली आहे. ही कार्यवाही कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर व त्यांच्या चमूच्यावतीने करण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान २०४ घरांमध्ये 'एडिस इजिप्ती' डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली. ही उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. याचबरोबर 'एडिस इजिप्ती' डासांची उत्पत्तीस्थळे तयार होऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत सदर घरांमधील व जवळपासच्या परिसरातील लोकांचे प्रबोधनदेखील या मोहिमेदरम्यान करण्यात आले. 

'झिका'चे परिणाम आणि पालिकेचे आवाहन
> 'झिका' विषाणूची लागण झाल्यास संबंधित व्यक्तीला साधारणपणे दोन दिवस ताप येणे तसेच अंगावर चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात
> गर्भधारणा झाल्यापासून पहिल्या तिमाहीत झिका विषाणूंची लागण झाल्यास बाळाचे डोके आकाराने तुलनेत कमी राहते व मेंदूचा विकास होत नसल्याचे लक्षात आले आहे
> 'डेंग्यू' व 'चिकून गुनिया' या आजारांना पसरविण्यास कारणीभूत ठरणारे 'एडिस इजिप्ती' हे डासच 'झिका' विषाणूचे वाहक असतात. त्यामुळे डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जी काळजी घेणे आवश्यक आहे, तीच काळजी 'झिका' बाबत देखील घेणे आवश्यक आहे.
> 'एडिस इजिप्ती' डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्याने दर सहा दिवसांनी घरातील सर्व पाण्याची भांडी रिकामी करुन व स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातील एक दिवस 'कोरडा दिवस' म्हणून पाळणे देखील आवश्यक आहे
> घरातील पाण्याचे ड्रम्स, टाक्या, घरातील शोभेचे कारंजे, मनी प्लांट, फेंग शुई बांबु प्लांट, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या इत्यादीतील पाणी रोज पूर्णपणे बदलण्याचे आवाहन कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात आले आहे
> 'झिका' विषाणूबाबत प्रतिबंधात्मक व सावधगिरीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे सुरू करण्यात आलेली 'एडिस इजिप्ती' डास शोधमोहिम या पुढे देखील सुरु राहणार आहे

Post Bottom Ad