रस्ता सुरक्षा मोटरसायकल व सायकल रॅलीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंद
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि इतरांना याची जाणीव करुन द्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
राज्य सुरक्षा पोलीस दल मैदान, गोरेगाव येथे बोरीवली प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित रस्ता सुरक्षा मोटरसायकल व सायकल रॅलीप्रसंगी श्री. देसाई बोलत होते. यावेळी दहिसर-बांद्रा वाहतूक पोलीस उपआयुक्त नामदेव चव्हाण, बोरीवली प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड, महिंद्रा कंपनीचे प्रमुख विजय कालरा, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे मार्क आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, मागील वर्षी महाराष्ट्रात रस्ते अपघातात सुमारे 20 हजार तर देशात दोन लाख व्यक्तींना मृत्यू आला. सुमारे सहा लाख लोकांना अपंगत्व आले. यात पादचारी, सायकल व मोटरसायकलस्वार तसेच लहान व तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची जाणीव ठेवत सर्वांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टिने वाहतूक नियमांचे पालन करावे. याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंद
या रॅलीत 2168 मोटरसायकल व सायकलस्वार सहभागी झाले होते. दरम्यान रस्ता सुरक्षेबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठीची ही जगातील सर्वात विशाल रॅली ठरली असून यांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये झाल्याचे प्रमाणपत्र यावेळी श्री. मार्क यांनी दिले. याआधी हा विक्रम अर्जेंटिनाच्या नावे होता, त्यात 2119 बाईक स्वारांचा सहभाग होता.
बॉलीवूड कलाकारांची उपस्थिती
या रॅलीसाठी अभिनेता पुलकित सम्राट, दिनो मारिया, रजनिश दुग्गल, अर्जुन बिजलानी, अनुपसिंह ठाकूर, रणविजय सिंग, गायक शान तसेच मलिष्का, भूमी त्रिवेदी, रायमा सेन व पल्लवी शारदा यांनी उपस्थित राहून रस्ते सुरक्षेबाबत अनुभव कथन केले.