वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात 12 ते 14  फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन, उद्यानविद्या कार्यशाळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात 12 ते 14  फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन, उद्यानविद्या कार्यशाळा

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान खाते आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने झाडे, फुले, फळे, भाज्यांचे २१ वे प्रदर्शन व उद्यान विद्या विषयक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०१६ ते रविवार, दिनांक १४ फेब्रुवारी, २०१६ या कालावधीत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा(पूर्व), मुंबई – ४०० ०२७ येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्रीमती. स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते उद्या, दिनांक १२ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.

यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सर्व गटनेते, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार वारिस युसुफ पठाण, आमदार भाई जगताप, स्थानिक नगरसेविका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा समिता नाईक, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) एस. वी. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, सह आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) शांताराम शिंदे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन व उद्यान विद्याविषयक कार्यशाळांविषयीः- महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ (२०१३ पर्यंत सुधारित) मधील प्रकरण चार कलम ७ (क) मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाने वर्षातून किमान एकदा तरी फुले, फळे, भाज्या व झाडे यांचे प्रदर्शन आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९६ पासून आतापर्यंत अशाप्रकारची २० प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. यंदा २१ वे प्रदर्शन आहे.       

या प्रदर्शनात कुंड्यांमधील वाढविलेली फळझाडे, फळभाज्या, परड्या, टोपल्या किंवा कुंडय़ांमध्ये वाढविलेली मोसमी/हंगामी फुलझाडे, कुंडय़ांमधील फुलांची झाडे, कुंडय़ांमधील वाढविलेले गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, कुंडय़ांमधील विविध प्रकारची शोभिवंत पानांची झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना, व्यक्तिगत, व्यवसायिक, धार्मिक संस्था यांनी परिरक्षित केलेली उद्याने, वाहतूक बेटे व रस्ते दुभाजक, हरित भूभाग (पट्टे), मैदाने यांचा समावेश असून त्याचे परिक्षण करण्यात येणार आहे व त्यात सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

सदर कालावधीमध्ये उद्यान विद्येवरील विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केली आहे. सदर कार्यशाळेत शहरी वनिकरण परिरक्षण आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ (२०१३ पर्यंत सुधारित) वृक्ष अधिनियमाची अंमलबजावणी, गांडुळ प्रक्रियेद्वारे कचऱयापासून सेंद्रिय खत निर्मिती व प्रात्यक्षिके, झाडांचे संरक्षण, उंच झाडांचे रोपण व परिरक्षण, वृक्षपेढी, बटुवृक्ष, सुगंधी व औषधी वनस्पती, झाडांची पैदास व परिरक्षण, निसर्ग उद्यान व बागकाम, परसबाग व घरातील झाडे, गच्चीवरील बाग/टेरारियम, गुलाब रोपांची लागवड व देखभाल, कलात्मक पुष्परचना व त्याविषयीचे प्रात्यक्षिके हे विषय अंतर्भूत आहेत.
       
कार्यशाळेत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंकडून प्रात्यक्षिकांसह व्याख्याने देण्यात येतील. कार्यशाळेच्या सुविधेचा विद्यार्थी, गृहिणी, विविध संघटना, संस्था, कंपन्या, शासकीय व निमशासकीय संस्था या ठिकाणी कार्यरत उद्यान विद्या कर्मचारी वा कोणीही व्यक्ती, सर्व विषयांसाठी किंवा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे नाव नोंदणी करू शकते. त्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा येथील उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात 'बृहन्मुंबई महानगरपालिका' या नावाने काढलेला रुपये ५००/- सर्व विषयांकरिता किंवा रुपये १००/- प्रति विषयाकरिताचा डिमांड ड्राफ्ट वा रोख रक्कम भरून नाव नोंदवून या संधीचा लाभ घेऊ शकते.
       
याव्यतिरिक्त नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार रोपे खरेदी करता यावीत यासाठी रोपे व उद्यान विषयक साधन सामुग्री विक्रीची व्यावसायिक दुकाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वसूचना देऊन आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसांच्या कालावधीसाठी दुकानाचे भाडे रुपये १० हजार इतके आहे. दुकानदारांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील. जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा, यासाठी अभ्यागतांना प्रवेश निशुल्क देण्यात येईल.

Post Bottom Ad