खाजगी गाड्यांवर मुंबई महानगरपालिका लिहिणे बेकायदेशीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2016

खाजगी गाड्यांवर मुंबई महानगरपालिका लिहिणे बेकायदेशीर

JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या किंवा भाडे तत्वावर घेतलेल्या गाड्यांव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी गाड्यांवर मुंबई महानगरपालिका, बीएमसी, एमसीजीएम असे लिहिण्याची किंवा स्टीकर लावण्याची परवानगी नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने माहिती अधिकारात कळविले आहे. 

वाहतूक पोलिस नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या असल्यास, सिग्नल तोडल्यास कारवाई करणार नाहीत या हेतून खाजगी गाड्यांवर शासकीय कार्यालयाच्या नावाचे स्टिकर लावण्याचे पेव फुटले आहे. पोलिस, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगर पालिका (एमसीजीएम / बीएमसी) असे स्टिकर लावणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अश्या गाड्या रस्त्याच्या कडेला नो पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या किंवा सिग्नल तोडताना सर्रास दिसतात. या गाड्या सरकारी गाड्या असल्याचे समजून वाहतूक पोलीसही कारवाई करण्यास दुर्लक्ष करत असतात. यामुळे असे स्टिकर लावून गाड्या फिरवणाऱ्यांचे चांगलेच फावलेले आहे. 

महाराष्ट्र सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढून खाजगी गाड्यांवर पोलिस लिहिणे गैरकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अश्या गाड्यावर कारवाई करण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारने असे परिपत्रक काढले असताना मुंबई महानगरपालिकेच्या नावाचा वापर करणाऱ्या खाजगी गाड्याही हजारोंच्या संखेने असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी पालिकेकडून खाजगी गाड्यांवर महापालिकेचे नाव लिहिले जात असल्याने या बाबत केलेल्या कायद्याची, काढलेल्या परिपत्रकाची माहिती मागवली होती. 

याबाबत माहिती अधिकारात माहिती देताना मुंबई महानगरपालिका ज्या गाड्या स्वतः विकत घेते किंवा भाडे तत्वावर ज्या गाड्या घेतल्या जातात त्याच गाड्यावर नियमाप्रमाणे मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम / बीएमसी) किंवा मुंबई महानगरपालिका सेवार्थ असे लिहिण्याची परवानगी आहे. इतर कोणत्याही खाजगी गाड्यांवर मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम / बीएमसी) लिहिणे किंवा असे स्टीकर लावण्याची कोणालाही परवानगी दिली नसल्याचे महापालिकेचे अशोक खैरनार कार्यकारी अभियंता (परिवहन) यांनी कळविले आहे. 

मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी असल्याने नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. मुंबईमध्ये वेळोवेळी हाय अलर्ट घोषित केलेला असतो. मुंबईमध्ये २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्यावेळी पोलिसांचे वाहन ताब्यात घेवून दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सरकारी गाड्यां असल्याचा फायदा घेत मुंबईमध्ये घुसणे, घातपात करणे सोपे जाऊ शकते यामुळे नुकतेच राज्य सरकारने परिपत्रक काढून ज्या प्रमाणे पोलिस लिहिलेल्या खाजगी गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी खाजगी गाड्यांवर बेकायदेशीर पणे महापालिकेचे नाव लिहिणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी केली आहे. 

Post Bottom Ad