मोहम्मद मुकीम शेख
होतकरु माहितीपट निर्मात्यांसाठी ज्ञान आणि सांस्कृतिक अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी माहितीपट हा एक उत्तम पर्याय असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. १४ व्या मिफ्फ अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विविध विषयांवरील माहितीपटांमधे प्रेक्षकांच्या दृष्टीकोनाला समृद्ध करण्याची क्षमता असते असेही ते म्हणाले.
जगभरातील चित्रपटांचा विद्यार्थ्यांना आणि चित्रपट प्रेमींना आस्वाद घेता यावा यासाठी विद्यापिठाच्या वतीने आणखी सात सभागृहे कार्यान्वित केली जाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली. मिफ्फने आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण केल्याचे या महोत्सवाचे संचालक मुकेश शर्मा यांनी सांगितले. भारतीय माहितीपट निर्मात्यांची कलात्मकता आणि आंतरराष्ट्रीय माहितीपट चळवळीचे अनुकरण न करण्याची त्यांची वृत्ती याचे शर्मा यांनी यावेळी कौतुक केले. हा महोत्सव सर्व चित्रपट प्रेमींच्या मनावर आपली अनोखी छाप उमटवेल अशी भावना शर्मा यांनी व्यक्त केली.