मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
एलईडी दिवे बसवण्याचे श्रेय कुणाचे, असल्या फुटकळ मुद्द्यावर वाद घालण्यापेक्षा सत्ताधा्रयांनी लाखो मुंबईकरांच्या आरोग्याशी निगडित असलेला डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपला केले आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला वारंवार फटकारल्यानंतरही जर सत्ताधा्रयांना अक्कल येत नसेल तर, आगामी निवडणुकांमध्ये मुंबईकर जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. गुरुवारी देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कच ्रयाला गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल १३ तास लागले. या आगीमुळे गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर, चेंबूर, सायन आणि आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डोळे जळजळणे, श्वसनासाठी त्रास, मळमळ आणि उलट्या अशा तक्रारी समोर आल्या आहेत. ही फक्त कालचीच घटना नसून या आधीही अशा आगी लागण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. देवनारसह मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपली असून डम्पिंग ग्राऊंडसाठी आता पर्यायी जागा शोधण्याची गरज आहे. हे माहित असूनही महापालिका त्याबाबत कोणतीही हालचाल करत नाही, हे संतापजनक असल्याचे अहिर म्हणाले. या शिवाय या मुद्द्यावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंडसाठी लवकरात लवकर पर्यायी जागा न शोधल्यास देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास मनाई केली जाईल, असा सज्जड दमही न्यायालयाने महापालिकला दिला होता. तरीही महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी या प्रश्नावर गंभीर नसल्याचे मा. अहिर म्हणाले. उलट या सत्ताधा्रयामध्ये फुटकळ मुद्दाचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरु आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष तर प्रत्येक निर्णय जणु आपल्याच पाठपुराव्यामुळे झाल्याचे दाखवण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून शिवसेना आणि भाजपाने आपापसात श्रेय लाटण्याची स्पर्धा करण्यापेक्षा डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा मार्गी लावावा, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईतील जनता यांना त्याच डम्पिंग ग्राऊंडमध्ये भिरकावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अहिर यांनी दिला .