मुंबई / JPN NEWS.in : कुख्यात डॉन छोटा राजनवरील खटले एकत्रित चालवण्यात यावेत, यासाठी विशेष न्यायालय स्थापण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाल केली होती. उच्च न्यायालयाने सरकारच्या विनंतीनुसार, छोटा राजनवरील सर्व खटले एकत्रित चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली आहे.
राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनवर महाराष्ट्रात तब्बल ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणाचाही समावेश आहे. छोटा राजनवर वेगवेगळ्या ठिकाणी केसेस नोंदवण्यात आल्याने, त्याला वेगवेगळ्या न्यायालयांत खटल्यासाठी हजर करावे लागेल. मात्र, त्याच्या जीवाला धोका असल्याने, राज्य सरकारने त्याच्यावरील खटले एकाच ठिकाणी चालवण्यात यावेत, यासाठी विशेष न्यायालय नेमण्यात यावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती मान्य करून, राजनवरील खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जे. डे हत्येप्रकरणी गेल्याच महिन्यात विशेष मोक्का न्यायालयाने छोटा राजनविरुद्ध वॉरंट बजावत तिहार कारागृह प्रशासनाला त्याला ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला. छोटा राजनला २५ आॅक्टोबर रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारताच्या स्वाधीन केले. राज्य सरकारने छोटा राजनवरील सर्व केसेस सीबीआयकडे वर्ग केल्या आहेत.
No comments:
Post a Comment