मुंबई / www.jpnnews.in : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याच्या आत्महत्येच्या विरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात असताना, मुंबईत शनिवारी त्याला काहीसे हिंसक स्वरूप प्राप्त झाले. अभाविपच्या माटुंगा येथील कार्यालयावर अज्ञात तरुणांनी लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे खिडकीची काच फुटून एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत फ्रान्सिस डिसुझा या पदाधिकाऱ्याच्या डोळ्याच्या वरील भागाला दुखापत झाली असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडून अज्ञात सहा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर दोन मोटारसायकलीवरून आले होते. हे भ्याड कृत्य ‘एनएसयुआय’ या विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित येमूला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. त्याबाबत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या निषेध व राजीनाम्याच्या घोषणा दिल्या जात असल्या, तरी कोणतीही अनुचित घटना घडलेली नव्हती. माटुंगा पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मार्बल आर्क इमारतीत अभाविपचे कार्यालय आहे. शनिवारी कार्यालयात फ्रान्सिस डिसुजा, अनिकेत ओव्हाळ, प्रमोद एकर हे दोन दिवसांनी आयोजित केलेल्या एका सभेबाबतचे नियोजन करीत होते. त्याच दरम्यान, दुपारी सव्वा चारच्या सुमारास कार्यालयावर लोखंडी रॉड फेकला गेला, त्यामुळे खिडकीची काच फुटली. तिघे तातडीने बाहेर पळत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर मोटारसायकलीवर दोन बाजूने पळून गेले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या प्रकरणी पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या शोध घेत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक जगदाळे यांनी सांगितले.