४७९ मृत व धोकादायक झाडांबाबत कार्यवाही सुरु
मुंबई / JPN NEWS.in
पावसाळ्या दरम्यान झाडे पडण्याची शक्यता व त्यामुळे होणा-या अपघातांची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागी असणारे मृत व धोकादायक वृक्ष, तसेच समतोलाच्या दृष्टीने छाटणीची गरज असणारी झाडे, याबाबत महापालिकेद्वारे योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. महापालिकेच्या उद्यान अधीक्षक खात्याद्वारे याबाबतचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याच्या अंमलबजावणीस आता सुरुवात झाली आहे.
या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रातील ४७९ मृत व धोकादायक झाडांपैकी २२९ झाडांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये सदरहू धोकादायक वा मृत झाड हलविणे अथवा हटविणे, बुंधा तसाच ठेवून बाकीचे झाड कापणे, झाडाची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करून झाडाचा भार कमी करणे इत्यादी परिस्थितीसापेक्ष कार्यवाहींचा समावेश आहे. उर्वरित २५० झाडांबाबतची कार्यवाही देखील जास्तीतजास्त जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच झाडांचा समतोल व्यवस्थित साधला जाण्याच्या दृष्टीने ४५ हजार ३८७ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रमाणशीर छाटणी देखील केली जाणार आहे.
याव्यतिरिक्त खाजगी जागेत किंवा सोसायटीच्या परिसरातील कोणतेही मृत वा धोकादायक झाड असल्यास त्याबाबत आपल्या क्षेत्रासाठी असणा-या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील (वॉर्ड ऑफीस) कनिष्ठ वृक्ष अधिकारी अथवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान अधिक्षक यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
पावसाळ्या दरम्यान झाडे पडण्याची संभाव्यता लक्षात घेऊन व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील सर्व झाडांची पाहणी करण्याचे व त्यावर आधारीत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा बृहन्मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी दिले होते. तसेच मृत व धोकादायक झाडांबाबतची कार्यवाही प्राधान्याने करण्याचे निर्देशही मेहता यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान अधीक्षक कार्यालयाद्वारे वर्ष २०१६ च्या पहिल्या सहा महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीस आता सुरुवात झाली आहे.
No comments:
Post a Comment