मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मोकळ्या जागा आणि मैदाने खाजगी संस्थांना देण्याबाबत महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने मुंबईतील भुखंड बचावण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडले असे आहे. मात्र तात्पुरत्या स्थगितीने काम भागणार नाही, तर मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने या धोरणावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.
त्याच सोबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी या आधी याच धोरणांतर्गत हडप केलेले भुखंड परत मिळवण्याबाबत सरकारचे नेमके काय धोरण आहे याचा खुलासाही झाला पाहिजे अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली. या धोरणाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आहोत, मात्र हा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करून त्यावर तोडगा काढला तरच मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करू, अशा शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदाने खाजगी तत्वावर विकसित करण्याबाबत महापालिकेच्या सुधार समितीने घेतलेल्या निर्णयाला सर्वच थरातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. मात्र या अगोदर जी मैदाने शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी गिळंकृत करत, त्या जागांचा उघडपणे व्यावसायिक वापर सुरू केला आहे, ती मैदाने परत मिळवण्याबाबत नेमकी काय उपाययोजना सरकार करणार याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे अहिर म्हणाले.
ही मैदाने हडप करणाऱ्या शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांची नावेही मुख्यमंत्र्यांनी जाहिर करावी, असे थेट आव्हानच अहिर यांनी यावेळी दिले. म्हणूनच या मुद्द्यावर आपला लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत मा. अहिर म्हणाले की शनिवारी चर्चगेट स्टेशनसमोर आयोजित करण्यात आलेली सह्यांची मोहिम सुरूच राहणार आहे.