मुंबई / JPN NEWS.in गेले ३ वर्षे सातत्याने तक्रारी केल्या महापौर, तत्कालीन पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांची भेट घेतली तरीही मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनीष मार्केट मधील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनीष मार्केटचे माजी अध्यक्ष इस्माईल जान मोहम्मद उर्फ बाबुभाई यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केला आहे.
तीन वर्षापूर्वी मनीष मार्केट मध्ये १५६ गाळे होते. येथे आग लावल्यानंतर या ठिकाणी २०० पेक्षा अधिक दुकाने निर्माण करण्यात आली. मनीष मार्केटच्या जागेवर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद डोसाम हारुन डोसा, युसुफ टायगर यांना मॉल बनवायचा आहे. त्यासाठी त्यांनी मार्केटची इमारत पडावी म्हणून १९ पिलर तोडले आहेत. कार पार्किंगच्या जागेत ४-५ दुकाने बनवण्यात आली आहेत. मार्केटच्या इमारतीच्या बाहेर रस्त्याला लागून शिडी बनवल्याने रस्त्यावरील वाहनांना त्रास होऊ लागला आहे. याबाबत सातत्याने तक्रार करूनही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करण्यास दुर्लक्ष करत आहेत. पालिका अधिकारी मुंबई पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा हफ्ता जात असल्याने बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी असतानाही डोसा आणि त्याच्या माणसांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप बाबुभाई यांनी केला आहे.
मोहम्मद डोसा याची या ठिकाणी दादागिरी चालते. भिवंडीला माल उतरवून अब्जो रुपयांचे मोबाईल आणि इलेक्ट्रोनिक सामान हात गाड्यावरून आणि बारदनामध्ये लपवून मुंबईच्या मनीष मार्केटमध्ये आणला जातो. मुंबई महानगरपालिकेचा आणि सरकारचा करोडो रुपयाचा महसूल बुडवला जात असतानाही अधिकारी मात्र चॉपर आणि तलवारीला घाबरून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत असे बाबुभाई यांनी सांगितले. सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने याबाबत त्वरित कारवाई न केल्यास मनीष मार्केट इमारत कधीही पडून मोठा अपघात होऊन शेकडो लोकांचा जीव जाऊ शकतो अशी शक्यता बाबूभाई यांनी वर्तवली आहे. बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी मोहम्मद डोसा आणि त्याच्या सहकाऱ्यांची दुकाने आणि संपत्ती दाखवूनही भारतातील सुरक्षा यंत्रणा कारवाई का करत नाही असा प्रश्न बाबुभाई यांनी यावेळी उपस्थित केला.
No comments:
Post a Comment