ब्रिटानिया व गजदरबंद उदंचन केंद्र प्रायोगिक स्तरावर लवकरच कार्यान्वित
मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधीत खात्यांनी व सर्व २४ प्रशासकीय विभागांनी येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने त्यांना नेमून दिलेली कार्ये व इतर संबंधित कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, तसेच गेल्या महिन्यात सादर केलेल्या कृती आराखड्याची परिपूर्ण अंमलबजावणी करावी असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) व संबंधित खातेप्रमुख यांना दिले आहेत.
येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने पावसाळा पूर्वतयारी विषयक विशेष नियोजन बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात काल संपन्न झाली. या बैठकीदरम्यान सर्व परिमंडळीय उपायुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने यापूर्वी सादर केलेला कृती आराखडा, त्यानुसार आतापर्यंत करण्यात आलेली कार्यवाही व यापुढे करण्यात येणारी कार्यवाही याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती दिली.
त्यावर महापालिका आयुक्तांनी सदर बाबत सर्व आवश्यक ती कार्यवाही वेळेत व योग्यप्रकारे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलीस, म्हाडा तसेच महापालिकेची सर्व संबंधित खाती यांच्यात योग्य समन्वय साधून अपेक्षित कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी परिमंडळीय उपायुक्तांची असल्याचे निर्देशित केले आहे.
पावसाळ्याच्या अनुषंगाने आयोजित विशेष नियोजन बैठकी दरम्यान खालील मुद्यांनुसार चर्चा करण्यात येऊन त्यानुसार संबंधितांना आदेशित करण्यात आले आहे:
- ब्रिटानिया उदंचन केंद्र हे ३१ मार्च पर्यंत तर गजदरबंद उदंचन केंद्र ३० एप्रिल २०१६ पर्यंत प्रायोगिक स्तरावर कार्यान्वित करुन ही दोन्ही उदंचन केंद्रे प्रायोगिक स्वरुपात (Trial and Run) १५ मे २०१६ पर्यंत चालविणे.१५ मे २०१६ नंतर ही दोन्ही उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या / SWD) यांना दिले.
- एलफिन्स्टन नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढील दोन महिन्यात पूर्ण करणे. यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी रेल्वे, पर्जन्य जल वाहिन्या व जल अभियंता या खात्यांमध्ये समन्वय साधून संबंधित कार्यवाही वेळेत पूर्ण करणे.
- हाजी अली येथील पर्जन्य जल उदंचन केंद्र (पंपींग स्टेशन) येथे जनित्र संच बसविण्याच्या अनुषंगाने ३१ जानेवारी २०१६ पर्यंत निविदा काढणे व संबंधित कार्यवाही करणे.
- महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पावसाचे पाणी साचू नये यासाठी परिमंडळ - १ चे उपायुक्त व पर्जन्य जल वाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता यांनी संयुक्त पाहणी करुन दिर्घकालिन तसेच तात्कालिक उपाययोजना सुचविणे.
- टेक्सटाईल नाला, मुख्याध्यापक नाला, वालभट नाला इत्यादी नाल्यांच्या पात्रातील अतिक्रमण हटविण्याबाबत तातडीची यथोचित कार्यवाही करणे.
- पोलीस, म्हाडा यासह महापालिकेचे जलअभियंता खाते, पर्जन्यजल वाहिन्या, मल निसा:रण खाते इत्यादींमध्ये सुसमन्वय साधून आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी असे आदेश सर्व परिमंडळीय उपायुक्त यांना देण्यात आले आहेत.