मुंबई / JPN NEWS.in - कुलाबा ते दहिसर, मुलुंड आणि मानखुर्द पर्यंतच्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी वारंवार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात यावे लागते. यात अधिकाऱ्यांचा बराच वेळ वाया जातो. यामुळे नागरिकांचा खोळंबा होतो. यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्याचा प्रस्ताव भाजपने महापालिका सभागृहात मांडला आहे.
पालिकेची विविध कार्यालये, रुग्णालये, अग्निशमन दलाचे केंद्र तसेच इतर विभाग शहराच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत. या अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोर्ट येथील पालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडे बैठकांसाठी पायपीट करावी लागते. मुंबईत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरातून फोर्टला पोचायचे झाल्यास एक ते दीड तास प्रवासात जातो. त्यानंतर परततानाही तेवढाच वेळ वाया जातो.
नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी कामानिमित्त या अधिकाऱ्यांच्या वरचेवर भेटी घेत असतात. अधिकारी मुख्यालयात बैठकीला गेल्यास तो दिवस पूर्णपणे वाया जातो. यावर उपाय म्हणून पालिकेने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करावे. जेणेकरून अधिकाऱ्यांचा प्रवासातील वेळ वाचेल आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो वापरता येईल, असा प्रस्ताव भाजपचे विनोद शेलार यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे.
No comments:
Post a Comment