मुंबई / JPN NEWS.in नाका कामगारांना शासनाचे फायदे मिळावे म्हणून कामगार आयुक्तांनी नाका कामगारांची जनगणना करावी, असे आवाहन ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे. नाका कामगारांच्या प्रश्नांसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
रविवारी आझाद मैदानात पार पडलेल्या नाका कामगार राज्यव्यापी अभियान समारोप सोहळ््यात ते बोलते होते. गायकवाड म्हणाले की, असंघटित पद्धतीने काम करणारे कामगार कंत्राटदारांचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश देऊन नाका कामगारांची जनगणना करायला हवी. कामगार नोंदणी प्रक्रियेतील ९० दिवस कामाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करून प्रत्येक नाक्यावरील कामगाराला ओळखपत्र द्यायला हवे. जेणेकरून शासनाने आखलेल्या योजनांचा लाभ प्रत्येक नाका कामगाराला घेता येईल.
नाका कामगारांसाठी संत सेवालाल महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव भाटेगावकर यांनी केली. भाटेगावकर म्हणाले की, मानव हक्क आयोगाप्रमाणे नाका कामगारांना मध्यान्ह भोजन सुरू करण्याचे आदेश शासनाने द्यावेत. त्याची जबाबदारी कंत्राट सुरू असलेल्या बिल्डरवर किंवा कंत्राटदारावर ठेवून अंमलबजावणीचे काम सरकारी अधिकाºयांना द्यावेत. कामगारांच्या पाल्यांची शैक्षणिक जबाबदारीही शासनाने घ्यायला हवी. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून कैकाडी, बंजारा, दलित समाज याच कामात अडकून राहिला आहे. त्यांचा विकास करण्यासाठी पुढील पिढी सुशिक्षित केल्याशिवाय पर्याय नाही.
कार्यक्रमाचे निमंत्रक अॅड. नरेश राठोड यांनी १ डिसेंबरपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील नाक्यांवरक जनजागृती केली होती. जनजागृती मोहिमेत त्यांनी प्रत्येक नाक्यावरील प्रतिनिधीला निवेदन घेऊन येण्याचे आवाहन केले होते. यावेळी उपस्थित प्रतिनिधींना कामगारांच्या हक्कांची माहिती देणारी पुस्तिका वाटत ‘लोकमत’ कालदर्शिकांचे मोफत वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment