मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
सोशल नेटवर्किंग साईटवरुन आक्षेपार्ह पोस्ट करुन स्वतःला अडचणीत आणणाऱ्या ट्विटराईट्सचे कान मुंबईचे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांनी टोचले आहेत. ‘तिच्या फोटोवरील असभ्य कमेंटमुळे तुम्हाला आमच्या सोबत दीर्घकालीन डेटवर यावं लागेल’ असं उपहासात्मक ट्वीट करुन त्यांनी टवाळखोरांना सावधतेचा इशारा दिला आहे.
जावेद अहमद यांच्या ‘वनलाईनर’ इशाऱ्याला दीड हजारांहून अधिक रिट्वीट्स तर हजाराच्या घरात फेव्हरिट्स आले आहेत. मुंबई पोलिसांनी सायबर सिक्युरीटी सप्ताहाचं आयोजन केलं असल्यामुळे अशा प्रकारचे ट्वीट्स हा ‘शहाण्यांना शब्दाचा मार’ आहे.
काही गुन्हेगार कीबोर्डला त्यांचं शस्त्र म्हणून वापरतात, 140 कॅरेक्टर्समध्ये तुमचं नशिब लिहिलं जाऊ देऊ नका, अशा अनेक ट्वीट्सना ट्विटराईट्सचा प्रतिसाद मिळत आहे. जर सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्ही जिवंत राहिलात, तरच त्याला असंख्य लाईक्स मिळतील, असा सावधतेचा इशारा देणारा ट्वीटही लक्ष वेधून घेत आहे.
मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकतंच ट्विटरवर पदार्पण केलं. त्यानंतर या माध्यमाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द पोलिस आयुक्त जावेद अहमद आणि देवेन भारती यांच्याशी झालेल्या चर्चांमधून हे ट्वीट्स पुढे येत आहेत. ट्विटरचं स्वरुप पाहता तरुणवर्गाला आपलीशी वाटणारी आणि सहज समजणारी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला जातो.