मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बोरिवलीतील गणपत पाटीलनगर आणि मालाडच्या कुरार गावात पाच बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. त्यांच्याविरोधात एमएचबी आणि कुरार पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
शहरात बनावट डॉक्टरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेऊन तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी बनावट डॉक्टरांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईला सुरुवात केली. गेल्या वर्षात 43 बनावट डॉक्टरांवर कारवाई झाली. बोरिवली आणि मालाड परिसरात बनावट डॉक्टर असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. कारवाईकरिता नऊ पथके बनवण्यात आली होती. गणपत पाटील नगरातील तीन आणि कुरार गावातील दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. या डॉक्टरांकडे इलेक्ट्रोपॅथीची पदवी असून ते ऍलोपॅथीचा सराव करत होते, असे पोलिसांनी सांगितले. हे डॉक्टर कमी पैशांत उपचार करत होते.