मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
हैदराबाद विद्यापिठातील राेहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येला भाजपची जातीयवादी मानसिकता जबाबदार असून सत्ताधाऱ्यांनी आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली कुजकट मानसिकता बदलण्याची गरज अाहे, असे सांगत रोहितच्या आत्महत्येप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. रोहितला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी मा. अहिर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी वरळी नाका येथे रास्ता रोकाे आंदोलन करण्यात आले.
हैदराबाद विद्यापीठ प्रशासन आणि राजकीय दबावाला कंटाळून रोहित वेमुला या तरूणाने आत्महत्या केली. रोहितच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त करत मा.अहिर म्हणाले की, त्याच्या आत्महत्येमुळे आपण भविष्यातील एक चांगला संशोधक गमावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुरोगामी आंबेडकरी विचारांचे या सरकारला वावडे असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. या अगोदर चेन्नई आयआयटीमध्येही पेरियार आंबेडकर स्टडी सर्कलवरही या सरकारने बंदी घातल्याच्या घटनेचा उल्लेखही अहिर यांनी यावेळी केला. तसेच ज्या तातडीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी सरकारची बाजू सावरण्यासाठी पुढे आल्या त्यावरून या प्रकरणाला सरकारच जबाबदार असल्याची बाबही अधारेखित होत आहे. आता या प्रकरणी आत्महत्या केलेला विद्यार्थी हा दलित नव्हता, असे अनेक मुद्दे उपस्थित करून मुळ विषय भरकटवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा भाजपने आपली रोगट आणि जातियवादी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिला. या आंदोलनात मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.