जैव वैद्यकीय कचरा शास्त्रीय पद्धतीनुसार गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे इत्यादी कार्यवाही सुयोग्यप्रकारे व त्वरेने पूर्ण व्हावी, याकरिता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय आस्थापनांनी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय आस्थापनांमध्ये जैव वैद्यकीय कचरा निर्माण होत असतो. हा कचरा त्याच्या प्रकारानुसार ५ रंगांच्या पिशव्यांमध्ये / कंटेनरमध्ये शास्त्रीय पद्धतीनुसार व संबंधित नियमांच्या अधिन राहून गोळा करण्यात येत असतो.याअनुषंगाने जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान ५,७७३ मेट्रीक टन एवढा जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जैव वैद्यकिय कचरा निर्माण करणा-या विविध संस्थामध्ये रुग्णालये, प्रसूती गृहे, चिकित्सालये,दवाखाने, आरो ग्य केंद्रे, जनावरांच्या संस्था, प्राण्यांची रुग्णालये, रोगशास्त्र प्रयोगशाळा, रक्तपेढी आदींचा समावेश होतो. जैव वैद्यकिय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम १९९८ च्या उपनियम ६ (६) अन्वये खाजगी रुग्णालयातील जैव वैद्यकिय कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी संबंधित वैद्यकीय आस्थापनेची आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील जैव वैद्यकीय कचरा गोळा करणे, त्यावर संबंधित नियमान्वये शास्त्रीय पद्धतीनुसार प्रक्रिया करणे आदी सर्व कार्यवाही प्रामुख्याने मे. एस.एम.एस. इन् होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेद्वारे देवनार क्षेपणभूमी जवळ उपलब्ध करुन देण्यात आलेल्या भूखंडावर `बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्वावर उभारण्यात आलेल्या जैव वैद्यकीय प्रक्रिया केंद्रामध्ये केली जाते. सध्या मे. एस.एम.एस. इन्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे महापालिका क्षेत्रातील साधारणपणे ९,८८८ इतक्या वैद्यकीय आस्थापनांना सध्या ही सेवा देण्यात येत आहे.