मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनतर्फे बुधवारी (ता. 20) मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईकर असलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी स्वतंत्र विभागाची घोषणा करावी, अशी अपेक्षा ओआरएफचे अध्यक्ष सुधिंद्र कुलकर्णी आणि रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष विवेक सहाय यांनी व्यक्त केली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असले, तरी कार्यक्षेत्र मोठे असल्याने महाव्यवस्थापकांना उपनगरीय प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि समस्यांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, परंतु मुंबईसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू केल्यास महाव्यवस्थापकांना पुरेसे लक्ष देता येईल, असे सहाय यांनी सांगितले. सध्या भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 37.75 टक्के प्रवासी मुंबई उपनगरीय रेल्वेचे आहेत. उपनगरी लोकलच्या दररोज 2816 फेऱ्या आहेत. त्यातून 80 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही सहाय यांनी केली. रेल्वे सेवेचा लाभ मिळणाऱ्या भागांना तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेल्वेला दरवर्षी निश्चित निधी दिल्यास आणि प्रवासी भाड्यात दरवर्षी वाढ केल्यास महामंडळाला आर्थिक व्यवहार्यता मिळू शकेल, असेही ते म्हणाले.