मुंबई / www.jpnnews.in - ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडविले पाहिजेत असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. आज भुमाता ब्रिगेडकडून शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर हे ट्विट महत्वाचे मानले जाते.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, नगर यांना सुचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्तापित करावा समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा, भारतीय परंपरेत आणि हिंदु धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहीले आहे. प्रथा परंपरांमध्ये कालसापेक्ष बदल हिच आमची संस्कृती आहे असेही ते एका अन्य ट्विटमध्ये म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकार शनी शिंगणापूर मंदिर अधिकारी आणि महिला कार्यकर्ते यांच्याशी बोलणं सुरु आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असे राज्यमंत्री राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, आज सांयकाळी शनिशिंगणापूरमध्ये चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार महिलांना मिळायलाच हवा अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या आंदोलक महिलांना सुपेगावाजवळ पोलीसांनी अडवले होते. मोठ्या प्रमाणावर आलेल्या या महिलांनी तिथेच निदर्शने केली होती. आम्हाला दर्शनाला का बंदी असा सवाल य महिलांनी विचारला असून मार्ग अडवल्यामुळे रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. ताब्यात घेतलेल्या भूमाता ब्रिगेडच्या सर्व महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात त्यांना पुण्याकडे रवाना केले होते.