मुंबई - धारावी पुनर्विकासाची निविदा येत्या १९ जानेवारीच्या आत काढण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दि ८ जानेवारी रोजी रात्री धारावी येथील जाहीर सभेत केली.
धारावीतील रहीवाशांचे पुनर्वसन करून त्यांना ३५० चौ. फुटांची मोफत घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्यामुळे गेली अनेक वर्षे संघर्ष करणाऱ्या धारावीतील रहीवाशांना न्याय मिळाला असून त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या धारावी विधानसभा मतदार संघातर्फे ८ जानेवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विजयोत्सवाच्या निमित्ताने धारावीतील रहीवाशांसाठी सरकार दरबारी संघर्ष करणाऱ्या मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री प्रकाश महेता यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. धारावी विधानसभा भाजपाचे अध्यक्ष मनीबालन यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता कार्यक्रमाला आमदार डॉ. तमीळ सेल्वन, रश्मी मिरचंदानी, नगरसेविका राजश्री शिरवडकर भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांच्यासह शिवसेना खासदार राहूल शेवाळे व भाजपाचे पदाधिकारी आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना अॅड. आशिष शेलार यांनी धारावीकरांच्या वतीने सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर धारावीतील रहीवाशांना जी घरे मिळणार आहेत त्याची किंमत मोठी आहे. त्यामुळे रहीवाशांनी कुठल्याही आमीशाला बळी पडून आपणाला भूरळ घालणाऱ्या एखाद्या दलालाला बळी पडू नका. आशा दलालांपासून सावध राहा असे सांगत भाजपा सरकारने अवघ्या १५ महिन्यांच्या कालखंडात धारावीकरांना न्याय देण्याचा निर्णय घेतला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गेली १५ वर्षे हा निर्णय घेतला नाही. त्यामुळे १५ वर्षांचा वनवास धारावीकरांना भोगावा लागला. असे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीचा जोरदार समाचार घेतला. तसेच धारावीकरांच्या वतीने सरकारकडे मागणी मागताना सरकाने ३५० चौ. फुटांचे घर दिले आहे त्यामुळे धारावीकरांना नक्कीच आनंद झाला आहे. मात्र त्याही पेक्षा जास्त मोठ्या आकाराचे घर मिळाले आणि सरकारला ते शक्य असेल तर ते करा अशी मागणी वजा विनंतीही त्यांना केली. तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता म्हणाले की, येत्या १९ तारखेच्या आत धारावीची निविदा निधेल आणि १९ तारखेनंतर या प्रकल्पाचे भूमीपूजन महायुतीच्या सर्व नेत्यांना आमंत्रित करून करण्यात येईल. हे सरकार जनतेचे आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच जनतेची कामे करण्यात .येत आहेत. धारावीकरांनीही सर्व मतभेद बाजूला ठेवून धारावीचा विकास ही एक लोकचळवळ आहे असे समजून पुढे यावे आणि आपला विकास साधावा असे सरकारच्या वतीने आव्हान केले. तर ही केवळ घोषणा नसून सरकारला धारावीचा विकास करायचा आहे. आम्ही म्हणूनच अत्यंत तातडीने हे निर्णय घेतले असेही त्यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment