मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
मुंबईतील लाखो भाडेकरुंवर वाढीव भाड्याचा भार लादणारा प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा रद्द करण्याची सरकारने केलेली घोषणा हा मुंबईकरांचा विजय आहे, अशा शब्दांत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रस्तावित कायदा रद्द व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन जनमताचा रेटा निर्माण करणार्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभारही मानले. तसेच बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच नव्या गृहनिर्माण धोरणातही मुंबईकरांच्या हिताच्या तरतुदींचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सामान्य मुंबईकरांच्या हिताआड येणा्रया जाचक भाडे नियंत्रण कायद्याला विरोध करण्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला. त्यासाठी सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला भरघोस प्रतिसाद देत मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासामुळे सरकारला या प्रकरणी माघार घ्यावी लागली. मुंबईकरांनी दाखवलेली ही एकजुट बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच नव्या गृहनिर्माण धोरणाच्या मुद्द्यावर भविष्यातही कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच या प्रकरणापासून धडा घेत सरकारने आगामी धोरणात सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करावा. जर सरकारने चांगल्या योजना आणल्या तर आम्ही जरूर त्या योजनांचे स्वागत करु, असेही अहिर म्हणाले .