JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेमधे कचरा गाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगाराचा अपघाती मृत्यु झाल्याने संतापलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी मृत सफाई कर्मचाऱ्याचे प्रेत महापालिका मुख्यालयात आणून तीव्र आंदोलन केले.
मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात एच पूर्व विभागात युनुस अहमद शेख (30) हे कचरा गाडीवर काम करत होते. दिनांक 8 जानेवारी रोजी युनुस शेख ज्या गाडीवर काम करत होते त्या कचरा गाडीचा अपघात होउन गाडी उलटली त्यात शेख हे जखमी झाले. त्याना के इ एम रुग्णालायत दाखल केले असता 9 जानेवारीला शेख यांचा मृत्यु झाला आहे.
शेख यांचा मृतदेह महापालिका कार्यालय बंद असल्याने 2 दिवस रुग्णालयात ठेवून मृतदेह सोमवारी मुख्यालयात आणून आंदोलन करण्यात आले. यावेळी 15 ऑगस्ट 2009 पासून कंत्राटी सफाई कामगारां साठी 46 टक्के लेव्ही देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाची अमलबजावणी करावी, कंत्राटी सफाई कामगाराना प्रोव्हिडंट फंड, कामगार विमा योजना लागू करावी, शेख यांच्या वारसाला नोकरी द्यावी अश्या मागण्या कचरा वाहतुक श्रमिक संघाच्या वतीने करण्यात आल्या.
पोलिसांच्या विनंती नंतर शेख यांचा मृतदेह अंतिम विधी साठी पाठवण्यात आला. यानंतर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांची श्रमिक संघाचे विजय दळवी, मिलिंद रानडे व कार्यकर्त्यानी भेट घेतली. यावेळी शेख यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत म्हणून 1 लाख 17 हजार रुपये, प्रोव्हीडंट फंड म्हणून जमा असलेली रक्कम पेंशन म्हणून तर एका मुलाला कंत्राटी काम देण्याचे आश्वासन दराडे यांनी दिल्याची माहिती विजय दळवी व मिलिंद रानडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment