मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
अभिनेत्री ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राला ओशिवरा येथील २००० चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ७० हजार रुपयांत बहाल केला जाणार आहे. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेसाठी प्रति चौरस मीटर ३५ रुपये आकारून त्याचे वितरण केले जाणार असल्याची धक्कादायक बाब, अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीमधून उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हेमा मालिनी यांच्या नाट्यसंस्थेस दिल्या जाणाऱ्या भूखंडाची माहिती मागितली होती. या माहितीमधून अंधेरी तालुक्यातील मौजे आंबिवली येथील भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले. हेमा मालिनी यांना २०१६ मध्ये भूखंड वितरीत करताना सरकारने १ फेबु्रवारी १९७६ मधील मूल्यांकनाचा आधार घेतला आहे. त्या वेळी प्रति वर्गमीटर १४० रुपये दर होता, त्याच्या २५ टक्के म्हणजे फक्त ३५ रुपये इतका दर हा भूखंड देताना आकारण्यात येणार आहे. हेमा मालिनी यांना यापूर्वी ४ एप्रिल १९९७ मध्ये अंधेरी तालुक्यातील मौजे वर्सोवा येथील भूखंड तत्कालीन सरकारने दिला होता. त्यासाठी त्यांनी १० लाख रुपयांचा भरणा केला होता. मात्र, त्यातील काही भाग सीआरझेडमुळे बाधित होत असल्यामुळे, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम केलेले नाही. आता भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष करीत, हेमा मालिनीच्या संस्थेस कमी किमतीत पर्यायी भूखंड वितरित करण्याचा घाट घातल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
कसा दिला भूखंड
वर्सोवा येथील भूखंडाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी हेमा मालिनीच्या नाट्यविहार केंद्राने ६ जुलै २००७ मध्ये केली होती. आरक्षित क्षेत्रापैकी २ हजार वर्गमीटर जागा नाट्यकेंद्राला देऊन, उर्वरित जागेवर नियोजित उद्यानाचा विकास त्यांच्या संस्थेमार्फत करण्याची तयारी दर्शविली होती. राज्य सरकारने संस्थेसंबंधी मागितलेल्या काही मुद्द्यांची माहिती संस्थेने समाधानकारक दिलेली नसतानाही त्यांची मागणी मान्य करण्यात आली. मौजे आंबिवली, तालुका अंधेरी येथील सर्वे क्रमांक १०९/१ नगर भूमापन क्रमांक ३ पैकी क्षेत्र २९३६०.५० चौरस मीटर उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेपैकी, २ हजार चौरस मीटर जागा देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव माधव काळे यांनी २३ डिसेंबर २०१५ रोजी दिले. महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला त्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर शासकीय चक्रे फिरली ७० हजारांत कोट्यवधीचा भूखंड हेमा मालिनीच्या नाट्यविहार केंद्रास बहाल करण्यास मंजुरी मिळाली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ जानेवारीला त्याबाबत हेमा मालिनी यांना पत्र पाठवून, पुन्हा काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली आहे. १८ आॅगस्ट २०१५ रोजी हेमा मालिनी या स्वत: भूखंडाच्या स्थळी उपस्थित होत्या, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राने आतापर्यंत सांस्कृतिक संकुल प्रकल्पाच्या नियोजित खर्चाच्या २५ टक्के रक्कम उपलब्ध असल्याची हमी दिलेली नाही. त्यामुळे एकूण खर्चाच्या २५ टक्के एवढी रक्कम उपलब्ध असल्याचे २ महिन्यांत, तसेच ७५ टक्के रकमेची पूर्तता कशी करणार, याबाबत ठोस माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. केंद्राने सांस्कृतिक संकुल प्रकल्पाचा नियोजित खर्च १८ कोटी ४८ लाख ९४ हजार ५०० रुपये असून, संस्थेकडे सध्या साडेतीन कोटी निधी असल्याचे कळविले आहे. उर्वरित निधी बॅँकेकडून उभा करण्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हा निधी प्रकल्प किमतीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि उर्वरित निधी कसा उभारणार? यात कोणतीही स्पष्टता नाही.