स्मारके उभारण्याबाबतचे सरकारचे धोरण जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2016

स्मारके उभारण्याबाबतचे सरकारचे धोरण जाहीर

JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, इतिहासप्रसिद्ध व्यक्ती, संत-महात्मे आणि राजकीय नेत्यांची स्मारके उभारण्याच्या धोरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची स्मारके उभारण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश असणारा सरकारचा निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. याबाबतची बातमी याच दिवशी "सकाळ‘मध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. 

या धोरणानुसार एकाच राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तीची राज्यात दोनपेक्षा जास्त स्मारके उभारता येणार नाहीत. ही स्मारके वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांत उभारता येतील. राज्यात दोनपेक्षा अधिक स्मारके उभारण्यासाठी आवश्‍यक असणारी जमीन आणि खर्च स्मारकाची मागणी करणाऱ्या संस्थेला करावा लागेल. त्यासाठी सरकार निधी देणार नाही. ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्ती यांच्या स्मारकाबाबत आहेत. अन्य मान्यवरांची स्मारके उभारताना नगरविकास विभाग आणि ग्रामविकास व जलसंधारण विभाग हे सामान्य प्रशासन विभागाच्या अनुमतीने स्वतंत्रपणे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहेत. यापुढे स्मारक ही एक योजना समजण्यात येणार आहे. 

पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नसून केवळ पुतळ्याच्या स्वरूपात स्मारके उभारू नयेत. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बहुपयोगी सभागृहे, संशोधन संस्था, ग्रंथालये, वाचनालये, वसतिगृहे इत्यादी समाजोपयोगी वास्तूंच्या स्वरूपात स्मारके उभारावीत. राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचे पैलू व कार्याची माहिती नागरिकांना मिळेल अशा पद्धतीने स्मारकाची आखणी करून ती उत्कृष्ट पर्यटनस्थळे होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad