मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in - महापालिकेकडून प्रसूतिगृह व पॉलिक्लिनिकसाठी सवलतीच्या दरात जमीन घेऊन नंतर गरीब रुग्णांची सेवा न करणाऱ्यां डॉक्टरांवर कारवाईसाठी लवकरच धोरण आणले जाईल, असे मुंबई महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.
या संदर्भातील जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्यासमोर झाली. मुंबईच्या उपनगरांत अनेक डॉक्टरांनी प्रसूतिगृह व पॉलिक्लिनिक उभारण्यासाठी महापालिकेकडून सवलतीच्या दरात जमीन घेतली आहे. गरीब रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करावेत, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र, रुग्णालय उभारल्यावर त्यांनी ती पाळलेली नाही. त्यामुळे परवान्यातील अटींचाही भंग केला जातो, असे अर्जदारांचे म्हणणे होते.