मुंबई / www.jpnnews.in मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अनेक महिने बंद होता, यासाठी नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन हा तलाव पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेत खुला झाला असून महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते त्यांचा आरंभ करण्यात आला.
मुलुंड येथील जलतरण तलावाचे सुमारे ६ हजार सभासद आहेत. यात २ हजार ७५० पुरुष, ९४५ स्त्रिया, १ हजार २४२ मुले व ८०१ मुली तसेच वरिष्ठ नागरिकांमध्ये २१६ पुरुष व २४ स्त्रिया सभासद आहेत. गतवर्षी मुंबईसह राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुंबई शहराला नियोजन पद्धतीने पाणीपुरवठा करता आला नव्हता, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेला कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलावांना होणारा पाणीपुरवठा बंद करावा लागला. मात्र मुलुंड येथील जलतरण तलावाच्या सभासदांनी महापौरांसह पदाधिकाऱयांकडे मागणी करुन हा तलाव सुरु करण्याची मागणी केली. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी व स्थानिक नगरसेवक तथा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनासोबत चर्चा केली.
या बैठकीदरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, मुलुंड येथील २ कुपनलिका व १ मोठी विहिर यातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत यावर हा जलतरण तलाव सुरु करता येतो, या निष्कर्षापर्यंत पदाधिकारी व अधिकारी आले, तेव्हा जलनिरीक्षण विभागाने तपासणी करुन पाणी जलतरणासाठी वापरण्यास योग्य आहे, असे सांगितल्यानंतर हा तलाव महापौरांच्या हस्ते सुरु करण्यात आला.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज (दिनांक २२ जानेवारी, २०१६) सायंकाळी मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यावेळी उप महापौर अलका केरकर, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, माजी महापौर दत्ता दळवी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक वैद्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.