मुंबई / www.jpnnews.in
देशातच नव्हे तर जगात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाची ख्याती आहे. या रुग्णालयातून मिळणारी दर्जेदार आणि तत्पर वैद्यकीय सेवा आलेल्या प्रत्येक रुग्णांला दिलासा देते. त्यामुळे हे रुग्णालय म्हणजे श्वास आणि विश्वास यांचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. के. ई. एम. रुग्णालयाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय डाक विभागाने विशेष लिफाफा तयार केला असून या लिफाफ्याचे अनावरणही महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर स्नेहल आंबेकर याप्रसंगी म्हणाल्या की, के. ई. एम. रुग्णालय अनेक अर्थानी वैविध्यपूर्ण आहे. या रुग्णालयाची ख्याती जगभर असल्याने महापालिका प्रशासनासमवेत आम्हा पदाधिकाऱयांचाही मान नि स्वाभिमान उंचावतो आहे. रुग्णांची सेवा करीत असताना येथील कर्मचारी सामाजिक दायित्वाने कार्यदेखील करतात. या रुग्णालयाची सेवा अशीच पुढे चालू रहावी, अशी सदिच्छा महापौरांनी व्यक्त केली. या रुग्णालयाच्या वृद्धीसाठी व इमारत विस्तारीकरणासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देशही महापौरांनी दिले.
उप महापौर अलका केरकर यांनी सांगितले की, के. ई. एम. रुग्णालयाची ओळख जगातील १०० रुग्णालयांमधील एक आहे. या रुग्णालयात आणखी विविध उप विभाग सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच या रुग्णालयाने आपली उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, के. ई. एम. रुग्णालयाने सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. या रुग्णालयात अनेक पडद्यामागील कार्यकर्ते आहे. त्यांचा आज सत्कार होताना पाहून आनंद होत आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱयांनी दिलेल्या सेवेमुळे त्यांनी सर्वांचाच विश्वास संपादन केला आहे. या रुग्णालयास अर्थसहाय्य करावे लागले तर खासदार निधीतून उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. खासदार अरविंद सावंत यांनी के. ई. एम. रुग्णालयाच्या ९० वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून अत्याधुनिक अशी ‘ब्लड बँक व्हॅन’ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. त्याची घोषणा अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाचा ९० वा वर्धापन दिन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत आज (दिनांक २२ जानेवारी, २०१६) सकाळी डॉ. जीवराज मेहता सभागृह, सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ येथे संपन्न झाला. यावेळी उप महापौर अलका केरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, ‘एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर’ प्रभाग समितीचे अध्यक्ष नंदकिशोर विचारे, स्थानिक नगरसेवक संजय आंबोले, नगरसेविका हेमांगी (ममता) चेंबूरकर, मुख्य पोस्टमास्टर जनरल (महाराष्ट्र परिमंडळ) अशोक कुमार दाश, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा, नामनिर्देशित नगरसेवक आश्विन व्यास, के. ई. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.