मुंबई / JPN NEWS.in - मुंबईतील 2014 सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याबाबत रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलेली मागणी ही अव्यवहार्य असून ती आगामी महापालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून करण्यात आल्याची टीका माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केली आहे. तसेच आठवले हे सध्या सत्तेत सहभागी असल्याने त्यांनी मांडलेल्या भुमिकेवर सत्ताधारी भाजपने आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या वर्षभरावर आलेल्या असतानाच 2014सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी ही अतिशय अव्यवहार्य असून लाेकांना भुलथापा देण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका माजी गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी केली आहे. आपण सत्तेत असताना आघाडी सरकारने 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी आमच्या सरकारने उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयांच्या याबाबतच्या निर्णयांचा अभ्यास केला होता. तसेच यापुढच्या काळात ही मर्यादा वाढवली जाणार नसल्याची स्पष्ट भुमिका तत्कालीन आघाडी सरकारने घेतली होती. हा सर्व इतिहास ताजा असताना अशा प्रकारची मागणी करणे हा लोकभावनेशी चालवलेला खेळ आहे. या निर्णयामुळे शहराच्या नियोजनावर काय विपरित परिणाम होईल, पायाभूत सुविधांवर किती ताण येईल अशा कोणत्याही बाबींचा विचार न करता निव्वळ मतांवर डोळा ठेवून ही मागणी सत्तेत सामिल असलेल्या रिपाईसारख्या पक्षाकडून केली जात असल्याचेही अहिर म्हणाले. म्हणूनच आपले सत्ताधार्यांना अवाहन आहे की, जर त्यांना आपल्या मित्र पक्षाचे नेते रामदास अाठवलेंची भुमिका रास्त वाटत असेल, तर त्यांच्या मागणीबाबत सरकारची अधिकृत भुमिका जाहीर करावी. तसेच अशा भुलथापा मारण्यापेक्षा सत्ताधार्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन किंवा शिवशाही प्रकल्प यासारख्या अस्तित्वात असलेल्या योजनांवर लक्ष केंद्रीत करून गरजूंना नियमानुसार घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
No comments:
Post a Comment