मध्य रेल्वेच्या 16 स्थानकांवर मुतारीच नसल्याने महिलांसाची कुचंबणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2016

मध्य रेल्वेच्या 16 स्थानकांवर मुतारीच नसल्याने महिलांसाची कुचंबणा

मुंबई / www.jpnnews.in - छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याणदरम्यानच्या 16 स्थानकांवर महिलांसाठी मुतारीच नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. मुंबईत शौचालये आणि मुताऱ्या उभारण्यासाठी "राईट टू पी‘ चळवळीने रान उठवल्यानंतरही मध्य रेल्वे महिलांना मुताऱ्या आणि शौचालयांची सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.  

रेल्वेस्थानकांवर स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी "राईट टू पी‘ ही चळवळ उभी राहिली. चळवळीने वेळोवेळी आंदोलन केले. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने या प्रश्‍नाची दखल घेतली. परंतु तरीही रेल्वे प्रशासन महिलांच्या प्रश्नाकडे अद्यापही दुर्लक्ष करत आहे. 


सीएसटी ते कल्याणपर्यंतच्या 26 स्थानकांपैकी केवळ 10 स्थानकांवरच महिलांसाठी मुतारी आहे; त्यातही कोपर व दादर वगळता सर्व स्थानकांवर एक किंवा दोनच मुताऱ्या (कम्पार्टमेंट) आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी महिलांना नाइलाजाने लघुशंकेसाठी शौचालयाचा वापर करावा लागतो. अन्य रेल्वेस्थानकांवर महिलांची कुचंबणा होते.

मध्य आणि हार्बर मार्गावरच्या कुर्ला रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते; परंतु तेथेही महिलांसाठी एकही मुतारी नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी रेल्वेस्थानकावरील मुतारी आणि शौचालयांबाबत मागितलेल्या माहितीला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरातून हे वास्तव पुढे आले आहे.

सीएसटी या महत्त्वाच्या स्थानकावरही महिलांसाठी केवळ एक मुतारी आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली स्थानकावरही फक्त एक मुतारी आहे. दादर ते ठाणेदरम्यान केवळ माटुंगा आणि भांडुप वगळता एकाही रेल्वेस्थानकावर महिलांसाठी मुतारी नाही.  रेल्वेस्थानकावर असलेल्या बऱ्याच मुताऱ्या या अस्वच्छ असतात; शिवाय तेथे गर्दुल्ले आणि पुरुषांची वर्दळ असल्याने महिला तेथे जाणे टाळतात.

काम सुरू 
पश्‍चिम रेल्वेने 2013 पासून आतापर्यंत फक्त दादर व मालाड या स्थानकांवर वातानुकूलित स्वच्छतागृहांचे काम सुरू केले आहे. भाईंदर, वसई रोड व विरार या रेल्वेस्थानकांवरही वातानुकूलित शौचालयांचे काम सुरू आहे.
मुताऱ्या असलेली स्थानके 
सीएसटी- 2, भायखळा- 1, दादर- 4, माटुंगा- 1, भांडुप- 1, ठाणे- 1, दिवा- 1, कोपर- 6, डोंबिवली- 2, कल्याण- 2
पश्‍चिम रेल्वेवरही वाईट अवस्था 
पश्‍चिम रेल्वेच्या दादर ते बोरिवलीदरम्यानच्या 14 स्थानकांपैकी फक्त सहा स्थानकांवरच महिलांसाठी मुतारी आहे; त्यात दादर, माटुंगा, खार, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. मात्र, पश्‍चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर महिलांसाठी केवळ एकच मुतारी आहे. अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन मुताऱ्या असून, त्या नसल्यासारख्या अवस्थेत आहेत. वांद्रे स्थानकावर तर मुतारीच नाही. 

Post Bottom Ad