एमएमआरडीएच्या 106 कोटींच्या मुख्यालयाचे अखेर उद्‌घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2016

एमएमआरडीएच्या 106 कोटींच्या मुख्यालयाचे अखेर उद्‌घाटन

मुंबई / www.jpnnews.in - एमएमआरडीएच्या बीकेसीतील 106 कोटींच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. 23) झाले. 2012 मध्ये बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु विविध कारणांमुळे एमएमआरडीएला आपल्या कार्यालयाचे कामही वेळेत करता आले नाही. 

एमएमआरडीएच्या पायाभूत प्रकल्पांप्रमाणे कार्यालयाच्या या इमारतीचे कामही तीन वर्षे रखडले. या इमारतीवर 106 कोटींचा खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. काम कासव गतीने झाल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवरचा भार वाढला. खर्चात 19 कोटींची वाढ झाली. गलगली यांना आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या कामाला 24 डिसेंबर 2007 मध्ये मंजुरी मिळाली. बांधकामाची मूळ रक्कम 87 कोटी होती. 31 डिसेंबर 2012 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण एमएमआरडीएने तीन वेळा कंत्राटदाराला मुदतवाढ दिली. परिणामी खर्चात 19 कोटींची वाढ झाली.

नऊ मजल्यांच्या या इमारतीमध्ये प्रेक्षागृह, दोन सभागृहे, दोन तळघरे, दोन सर्व्हिस फ्लोअर, सीसी टीव्ही, स्कॅनर आणि इतरही सुविधा आहेत. मुंबईतील प्रकल्पांकडे जागतिक दर्जाच्या कंपन्यांची नजर असल्याने सरकारी यंत्रणेचे कार्यालय सुरेख आणि प्रशस्त असायलाच हवे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या इमारतीचे कौतुक केले. "दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2, दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-7 या व्यतिरिक्त एमएमआरडीएच्या अन्य प्रकल्पांवर काम करणाऱ्या मनुष्यबळाला या अतिरिक्त जागेचा उपयोग होईल‘, असे आयुक्‍त यु. पी. एस मदान यांनी सांगितले. उद्‌घाटनाला खासदार पूनम महाजन, आमदार ऍड. आशीष शेलार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad